uddhav thackrey apologises marathas over cartoon controversy

मुंबई : ‘सामना’तील वादग्रस्त व्यंगचित्राबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर माफी मागितली आहे. “व्यंगचित्रामुळे भावना दुखावल्या असल्यास, शिवसेनेचा प्रमुख म्हणून महाराष्ट्रातील माझ्या माता-भगिनींची माफी मागतो.”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी जाहीर माफी मागितली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकातील व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाईंनी काढलेल्या व्यंगचित्रावरुन राज्यातील राजकारण तापलं होतं. मराठा मोर्चांबद्दल वादग्रस्त ठरलेल्या व्यंगचित्रावरुन शिवसेनेवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात होती. व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी ‘सामना’तून दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र, तरीही वाद कमी होण्याचा नाव घेत नव्हता. अखेर आज उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर माफी मागितली आहे.

उद्धव ठाकरेंकडून जाहीर माफीनामा

“शिवराय आमचे दैवत आहेत. त्यामुळे आम्ही कधीही महिलांचा अवमान केला नाही. शिवसैनिक माता भगिनींचा अपमान करु शकत नाही. मात्र, तरीही महाराष्ट्रातल्या माता भगिनींना सांगतोय की, व्यंगचित्रामुळे भावना दुखावल्या असल्यास शिवसेनेचा प्रमुख म्हणून माफी मागतो.”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागितली.

“गेल्या आठवड्यात व्यंगचित्रावरुन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. व्यंगचित्राचा हेतू अपमान करण्याचा नव्हता. व्यंगचित्राचा वाद शांत झालाय, मात्र अपप्रचार माझ्या जिव्हारी लागला. यादरम्यान शिवसेनेच्या बाजूने उभं राहणारऱ्या शिवसैनिकांना धन्यवाद देतो”, असेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

“मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवा”

मराठा आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास आहे. मात्र, मराठा आरक्षणाचा मुद्दा चिघळत ठेवण्यापेक्षा कालमर्यादा ठरवायला हवी. यासंदर्भात एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची गरज आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवाय, शिवसेनेने विशेष अधिवेशनाची मागणी लेखी स्वरुपात दिली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

संभाजी ब्रिगेडकडूनही वादावर पडदा

उद्धव ठाकरेंच्या जाहीर माफीनंतर संभाजी ब्रिगेडकडूनही व्यंगचित्राच्या वादावर पडदा टाकण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडचे नेते विकास पासलकर म्हणाले, “या प्रकरणात राजकारणाचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. व्यंगचित्रावरुन संतापाच्या प्रतिक्रिया या जनभावना होत्या. उद्धव ठाकरेंच्या माफीनंतर आता वाद संपला आहे.

Comments (2)

  • Pankaj chavan

    माफी मागत असताना मराठा समाजाचा कुठेही उल्लेख नाही . केवढा हा मराठा समाजाप्रती असणारा आकस…. जागे व्हा, मराठा शिवसैनिकांनो…..

  • Vilas Tathod

    उद्धव जीनि जर माफीच मागायची होती तर २६ किंवा २७ सप्टेंबर लाच का नाही मागितली

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked (*).

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>