मुंबईत धडकणार मराठा क्रांती मोर्चा दिवाळीनंतर..! राज्यव्यापी समन्वय समितीच्या बैठकीला उत्स्फुर्त प्रतिसाद

मुंबई, ता.30: राज्यभरात सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चा राजधानी मुंबईत दिवाळीनंतर धडकणार आहे. आज शिवाजी मंदीर मधे राज्यभरातील समन्वय समितीच्या कार्यकर्त्याची बैठक झाली. यावेळी मुंबईतल्या मोर्चाबाबत उपस्थितांमधे प्रचंड आग्रह होता. मोर्चाची तारिख आजच जाहीर करावी अशी आग्रही मागणी करण्यात येत होती. मात्र मुंबईतला मोर्चा हा जगातला सर्वात मोठा मोर्चा म्हणून नियोजन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी वेळ व समन्वय गरजेचा अाहे. मुंबईची भौगोलिक स्थिती, वाहनांची पार्किंग व्यवस्था, एवढी मोठी संख्या एकत्र येण्यासाठीची जागा व मुंबईतली वाहतुक यंत्रणा याचे नियोजन करावे लागेल. अशी भूमिका जिल्ह्याजिल्ह्यातून आलेल्या समन्वयकांनी मांडली. मात्र काही संघठनांचा आग्रह मोर्चाची तारिख निश्चीत करा असा आग्रह होता. सरकारला कळू द्या मराठ्यांची ताकद, असा सुरही काहींनी लावला होता.
अखेर महिला कार्यकर्तांनी मध्यस्थी करून मोर्चाबाबत समन्वयाने निर्णय घेण्याची सूचना केली.
त्यावर, मोर्चा दिवाळी नंतर व हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर काढण्याच्या निर्णयावर एकमत झाले.
त्यासाठी बैठकीनंतर प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली.
दरम्यान, यंदाच्या दिवाळीत प्रत्येक घरात कोपर्डी बलात्कारची बळी ठरलेल्या भगिनीला आदरांजली म्हणून एक पणती लावण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तर दिवाळीत नवी कपडे घातल्यास त्यावर एक काळी फित लावून मराठा मोर्चाच्या मागण्या मान्य न झाल्याचा निषेध नोंदवण्याचाही निर्णय झाला.
राज्यभरातील मराठा समाज मुंबईत मोर्चाला उपस्थित राहणार असल्याने त्यासाठीच्या तयारीची राज्यव्यापी बैठक लवकरच घेण्यात येणार आहे. या बैठकीतच मुंबईतल्या महामोर्चाची अंतिम तारिख निश्चित करण्यात येणार आहे.
आजच्या बैठकीला भंडारा, गोंदीया वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यातून सुमारे 1500 संयोजक व समन्वयक आले होते.

maratha-kranti-morcha-banner-2