15781123_791644590974643_6299996987798644304_n

छत्रपती शिवरायांनी माँसाहेब जिजाऊ व शहाजीराजेंच्या प्रेरणेने स्वराज्य निर्माण केले व या स्वराज्यास सार्वभौमत्व मिळवून देण्यासाठी सन १६७४ साली रयतेसाठी स्वतंत्र व सार्वभौम “छत्रपति” गादी स्थापन केली. या गादीचे प्रथम छत्रपति, स्वराज्य निर्माते शिवछत्रपति महाराजांच्या निर्वाणानंतर युवराज संभाजीराजे ‘छत्रपति’ झाले. संभाजी महाराजांनी आपल्या नऊ वर्षांच्या कार्यकालात किती संकटांना तोंड देत रयतेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले इथपर्यंतचा इतिहास आपल्याला ज्ञात आहेच मात्र संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर खऱ्या अर्थाने स्वराज्याचे रक्षण केले ते शिवरायांचे सुपुत्र, स्वराज्याचे तिसरे छत्रपति राजाराम महाराज व शिवस्नुषा महाराणी ताराबाई यांनी.

१६८९ साली शंभूराजेंच्या बलिदानानंतर महाराणी येसूबाईंनी आपले धाकटे दीर युवराज राजाराम महाराजांना गादीवर बसविण्याचा निर्णय घेतला. महाराणी येसूबाई व युवराज राजाराम महाराज रायगडावर होते व रायगडास मुघल फौजेने वेढा घातला होता. राजाराम महाराजांना गादीवर आणण्यासाठी प्रथम महाराजांना सुरक्षित ठिकाणी पाठविणे गरजेचे होते. त्यामुळे येसूबाई राणीसरकारांच्या आदेशाने काही मोजक्या मावळ्यांसह राजाराम महाराज रायगडचा वेढा भेदून प्रथम प्रतापगड- पन्हाळा व तेथून दक्षिणेस जिंजी किल्यावर आले.

महाराज रायगडाहून बाहेर पडल्यानंतर लवकरच मुघलांनी रायगड ताब्यात घेऊन महाराणी येसूबाई व शंभूपुत्र युवराज शाहूंना कैद केले. छत्रपति राजाराम महाराजांनी महाराष्ट्रापासून हजारो कोस दूर असणाऱ्या जिंजीमधून युद्धाची सूत्रे हलविण्यास सुरुवात केली. महाराजांनी अत्यंत पराकाष्ठेने औरंगजेबाच्या सेनासागराशी लढत देत स्वराज्याचे अस्तित्व टिकवून ठेवले मात्र दुष्ट काळाने महाराजांवर घाला घातला. छत्रपति राजाराम महाराजांचे अगदी तरुण वयात आकस्मिक निधन झाले. स्वराज्याचे युवराज शंभूपुत्र शाहू मुघलांच्या कैदेत होते. राजाराम महाराजांचे पुत्र शिवाजीराजे व संभाजीराजे अगदी लहान होते. स्वराज्याला छत्रपति अथवा प्रबळ नेतृत्व उरले नव्हते. औरंगजेब हर्षाने उन्मत्त झाला. मराठ्यांचे राज्य आता आपल्या ताब्यात येणार याचा त्याला आत्मविश्वास वाटू लागला. मात्र राजाराम महाराजांच्या पत्नी शिवस्नुषा महाराणी ताराबाई यांनी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेत औरंगजेबाच्या सेनासागरावर त्वेषाने हल्ले चढवले. स्वतः युद्धांचे नेतृत्व करीत मुघल फौजेस पळून जाण्यासही जागा सोडली नाही. महाराष्ट्र गिळायल्या आलेल्या औरंगजेबाचे थडगे महाराष्ट्राच्या महाराणीने याच महाराष्ट्रात बांधले ! मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध महाराणी ताराबाईंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी जिंकले.

63580_230591137084139_2096725979_n

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा आझमशाह याने मराठ्यांमध्ये छत्रपतींच्या गादीसाठी दुफळी माजावी या दुष्ट हेतूने शंभूपुत्र शाहू महाराजांना कैदेतून मुक्त केले. शाहू महाराजांनी छत्रपतींच्या गादीवर आपला हक्क सांगितला मात्र त्यांनी मुघलांच्या सनदा आणल्याचे सांगत ताराराणींनी तो अमान्य केला. शाहू संभाजीराजेंचे पुत्र ; त्यामुळे गादीवर प्रथम अधिकार त्यांचा ! या भावनेने कित्येक बडे सरदार शाहूंना सामील झाले मात्र एक स्त्री असूनही रणांगणावर उतरुन स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या महाराणी ताराबाईंचा शब्द प्रमाण मानून काही सरदार ताराराणींच्या बाजूने उभे राहिले. यामुळे मराठ्यांमध्ये दुफळी निर्माण झाली व शाहू महाराज व ताराराणींमध्ये गादीसाठी युद्ध झाले. त्यावेळी मराठा साम्राज्याची राजधानी साताऱ्यास होती मात्र युद्धामध्ये पराजित झाल्यामुळे ताराराणींनी पन्हाळगडावर आश्रय घेतला. नियतीचे खेळ पहा, ज्या ताराराणींनी अर्ध्या जगावर राज्य करणाऱ्या औरंगजेबाच्या पाच लाख सेनेशी मूठभर सैन्यानीशी सात वर्षे यशस्वी झुंज दिली त्याच ताराराणींना मुलाप्रमाणे असणाऱ्या आपल्या पुतण्याकडून हार पत्करावी लागली.

photos of chatrapati

photos of chatrapati

युद्धात विजयी झाल्यानंतर शाहू महाराजांनी साताऱ्यास स्वतःस राज्याभिषेक करवून घेतला व १७०७ साली ताराराणींनी पन्हाळगडावर करवीर गादीची स्वतंत्र स्थापना केली. रयतेच्या स्वराज्याची दोन शकले झाली व सातारा व करवीर अशा छत्रपतींच्या दोन गाद्या अस्तित्वात आल्या. सुरुवातीस ताराराणी व शाहू महाराजांमध्ये गादीसाठी युद्ध झाले मात्र करवीर गादीच्या स्वतंत्र स्थापनेनंतरही महाराणी ताराराणी छत्रपती शाहू महाराजांकडे साताऱ्यासच असायच्या. शाहू महाराजांच्या मनात ताराराणींबद्दल प्रचंड आदर होता. आपल्या पत्रांत महाराज ताराराणींचा उल्लेख “मातोश्री” असा करायचे. पुढे शाहू महाराजांस पुत्र नसल्याने त्यांनी करवीर गादीहून ताराराणींचे नातू व आपले पुतणे युवराज रामराजे यांना दत्तक घेतले. शाहू महाराजांनंतर युवराज रामराजे सातारच्या गादीवर छत्रपति झाले. ज्या शाहू महाराजांनी शिवाजीराजांस छत्रपति होण्यास विरोध केला त्याच शाहूंना शिवाजीराजांच्याच मुलाला दत्तक घेऊन छत्रपति करावे लागले. दरम्यान, सातारा व करवीर छत्रपति महाराजांमध्ये सन १७३१ साली ‘वारणेचा तह’ होऊन दोन्ही राज्ये स्थिरस्थावर झाली होती व परस्परांच्या गाद्यांस दोन्ही छत्रपतिंनी मान्यता दिली होती.

करवीर छत्रपति व सातारकर छत्रपति यांच्यातील वाद हा वारणेचा तह म्हणजेच सन १७३१ पर्यंतच मर्यादित राहिला. वारणेच्या तहानंतर दोन्ही छत्रपतींमध्ये अत्यंत सलोख्याचे संबंध होते. कोल्हापूरचे संभाजीराजे अनेकदा सातारला येऊन शाहू महाराजांकडे राहत असत. वारणेच्या तहानंतर पुन्हा कधीही सातारा व करवीर छत्रपतींमध्ये वितुष्ट आले नाही, उलट वेगवेगळ्या प्रसंगी सातारचे छत्रपतिही कोल्हापूरास छत्रपतिंकडे राहण्यास येत असत. छत्रपति प्रतापसिंह महाराज कोल्हापूरास आले असताना कोल्हापूरास छत्रपति महाराजांनी त्यांचे केलेले भव्य स्वागत व त्यांचा पाहुणचार यावर अत्यंत वाचनीय असा समकालीन लेख उपलब्ध आहे. ( याच प्रतापसिंह महाराजांचे चरित्र लिहावे, हि कोल्हापूरचे छत्रपति शाहू महाराजांनी मृत्यूशय्येवर असताना व्यक्त केलेली महाराजांची शेवटची इच्छा होती. )

1948258_806799752741066_4731985326646275665_n

जेव्हा सातारच्या पेशव्यांनी व त्यांच्या सरदारांनी सातारकर छत्रपतींना कैद करुन राज्यकारभार स्वतःच्या हाती घेतला, तेव्हा करवीरचे छत्रपति फौजफाटा घेऊन सातारकर छत्रपतींच्या मदतीस धावले होते, मात्र दुर्दैवाने छत्रपतींना त्यामध्ये यश आले नाही. याच कारणांनी करवीर छत्रपतींचा पेशव्यांशी वारंवार संघर्ष होत राहिला. वारणेच्या तहानंतर पेशव्यांनी अथवा पेशव्यांच्या आदेशाने ज्या सरदारांनी करवीर राज्यावर हल्ले केले होते, त्यातील एकासही सातारकर छत्रपति महाराजांची परवानगी अथवा पाठिंबा नव्हता. पेशव्यांच्या राज्यलोभामुळेच पेशवे कोल्हापूर राज्यावर हल्ले करायचे. मात्र यामुळे दोन्ही छत्रपतींचे परस्परांशी असलेल्या अत्यंत प्रेमाच्या व सलोख्याच्या संबंधांस गालबोट लागले नाही.

करवीर व सातारा गादीच्या छत्रपतींचे सलोख्याचे संबंध आजपर्यंत टिकून आहेत. आई भवानीच्या कृपेने व माँसाहेब जिजाऊंच्या शिकवणीने हे संबंध असेच दृढ राहतील….

#करवीर_राज्य #सातारा_राज्य #KarvirRiyasatFB

छायाचित्रे –
• अंबारीमध्ये विराजमान छत्रपति शाहू महाराज व छत्रपति संभाजीराजे ( ऐतिहासिक पेंटींग ),
• कोल्हापूरचे महाराजकुमार मालोजीराजे व सातारचे छत्रपति उदयनराजे,
• नवीन राजवाडा कोल्हापूर येथे महाराजकुमार मालोजीराजे, छत्रपति शाहू महाराज व छत्रपति उदयनराजे,
• युवराज संभाजीराजे व छत्रपति उदयनराजे,
• छत्रपति उदयनराजे व छत्रपति शाहू महाराज.

करवीर रियासत

There are no comments yet.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked (*).

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>