दारिद्रय़ाच्या उन्हात मराठा शिजला !
मुंबईतल्या मराठा समाजाचा दैनिक नवशक्तीचे प्रतिनिधी प्रकाश सावंत यांनी घेतलेला वेध.
मरहट्टा. मराठा. लढाऊ, राज्यकर्ती जमात. सर्वांना सोबत नेणारी. स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवणारी. मोडेन पण वाकणार नाही नि मरेन पण हटणार नाही अशी त्यांची स्वभाव गुणवैशिष्ट्येे. मराठ्यांमध्ये शहाण्णव कुळी, पंचकुळी, सप्तकुळी, देशमुख, पाटील असे नाना घटक. पण एकेकाळचे राजे, सरदार, जहागिरदार, वतनदार, इनामदार नि त्यांच्या वंशजांच्या नशिबी आता दारिद्रय नि निव्वळ मोलमजुरी आलीय….
इ.स.पुर्व काळातील मौर्यवंशापासुन नंतरच्या सातवाहन, क्षत्रप, चालुक्य, यादव वंशातील राजापर्यंत मराठा जातीचे वर्चस्व दिसुन येतेय. ब्रिटिशांची सत्ता येईपर्यंत जवळपास दीडशे वर्षे मराठ्यांनी राज्य केलेय. राज्याबाहेरच्या मराठा कुटुंबियांमध्ये ग्वाल्हेरचे शिंदे, बडोद्याचे गायकवाड, मुधोळचे घोरपडे, इंदुरचे होळकर आणि तंजावरचे भोसले असल्याचे सांगण्यात येतेय. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या सैन्यदलात सरसेनापती हंबीरराव मोहिते, प्रतापराव गुजर, सरदार संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांनी अतुलनीय शौर्य गाजविलेय. आझाद हिंद सेनेचे जनरल जगन्नाथराव भोसले, बडोदा आर्मीचे जनरल नानासाहेब शिंदे, जनरल एस.पी.टी. थोरात, ब्रिगेडियर अमृतराव मोहिते आदींनी भारतीय लष्करात अपुर्व कामगिरी बजावलीय.
पात्रता व पराक्रम या मापदंडामुळे “मराठा” हा गुणात्मक शब्द बनला. पुढे व्यवसायावरुन जाती पडल्या. मराठा म्हणवुन घेणाऱ्यांमध्ये सांपत्तिक स्थिती, सामाजिक स्थान यावरुन अनेक स्तर निर्माण झाले. शेती कसणाऱ्यांना कुणबी म्हणु लागले. कुठे मराठा कुणबी. कुठे कुणबी मराठा. कुणब्यांमध्ये त्या त्या भागातील रीतीरिवाजाप्रमाणे अनेक प्रकार निर्माण झाले. आजही बहुसंख्य मराठे सहकारात, राजकारणात आणि लष्करी सेवेत अग्रेसर. स्वातंत्र्यानंतरही महाराष्ट्रावर खऱ्या अर्थाने राज्य केलेय ते राज्यकर्ते म्हणुन मराठ्यांनीच.
मुंबईत पंधरा लाख !
मुंबईत जवळपास बारा ते पंधरा लाख मराठे. लालबाग, परेल, वरळी, प्रभादेवी, दादर, वांद्रे, माहीम, विलेपार्ले, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, सायन, चेंबुर, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंडला मोठी लोकवस्ती. याशिवाय, मराठा मंदिर, शिवाजी मंदिर, मुलुंड मराठा मंडळ, मालाड, कांदिवली मराठा मंडळ, तावडे ज्ञाती, परब-प्रभु ज्ञाती मंडळ, सावंत ज्ञाती मंडळ, राजेशिर्के ज्ञाती मंडळ अशा विविध संस्था-संघटना कार्यरत आहेत. समाजबंधुंचा राजकीय कल शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यानंतर काहीसा काँग्रेस, भाजप, मनसेकडे.
महापौर श्रध्दा जाधव, शुभांगी शिर्के, प्रभाकर शिंदे, आशिष शेलार, अशोक सावंत, अजित रावराणे, विद्या चव्हाण, शैलेश परब, बळीराम घाग, सरस्वती भोसले, ज्योती भोसले, मधुकर दळवी, जगदिश सावंत, प्रकाश चाळके, स्नेहलता दळवी असे अंदाजे पंधराच्या आसपास नगरसेवक असल्याचे सांगण्यात येतेय. राज्याचे मंत्री वा आमदार यांच्यापेक्षा मुंबई महानगरपालिकेच्या एकुण नगरसेवकांमध्ये मराठा टक्का बेतास बात असल्याचे बोलले जातेय.
राज्य मराठा समन्वय समितीच्या माध्यमातुन मराठ्यांच्या विविध संघटनांना एकत्र आणण्याचा प्रयत्न अलीकडेच झाला. मराठा सेवा संघ (पुरुषोत्तम खेडेकर), शिवसंग्राम (विनायक मेटे), भारतीय मराठा महासंघ (किसनराव वरखिंड), अखिल भारतीय मराठा सेवा संघ (विजयसिंह महाडिक), महाराष्ट्रीय मराठा महासंघ (अंकुशराव पाटील), छावा मराठा युवा संघटना (प्रा. देवीदास वडजे), छावा (प्रा. चंद्रकांत भराड), अखिल भारतीय मराठा महासंघ (सुरेश माने), बुलंद छावा (दास शेळके), क्रांती सेना (शालिनीताई पाटील), छावा (नानासाहेब जावळे) अशा जवळपास बारा संघटना कार्यरत आहेत.
राजकारणातील टक्काही उतरणीला !
मुंबईचे महापौर म्हणुन बाबुराव शेटे (१९८०), दत्ताजी नलावडे (१९८६), रा.ता.कदम (१९९५), नंदू साटम (१९९८), दत्ता दळवी (२००५), श्रध्दा जाधव (२०१०) आदींची नावे घेतली जात आहेत. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण (१९६०), वसंतदादा पाटील (१९७७/८३/८५), शंकरराव चव्हाण (१९७७), बाबासाहेब भोसले (१९८३), शिवाजीराव निलंगेकर पाटील (१९८६), शरद पवार (१९७८/८८/९३/९५) नारायण राणे (१९९९), विलासराव देशमुख (१९९९/२००४), अशोक चव्हाण (२००८) आणि पृथ्वीराज चव्हाण (२०१०). उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आर.आर.पाटील, विजयसिंह मोहिते पाटील.
याशिवाय अण्णासाहेब पाटील, पी.के.सावंत, रामदास कदम, दत्ताजी नलावडे, डॉ.पतंगराव कदम, बाळासाहेब विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, भाऊसाहेब थोरात, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, शिशिर शिंदे, विनोद तावडे, विनोद घोसाळकर, प्रवीण दरेकर, भाई जगताप, अलका देसाई, विजय सावंत, दीपक सावंत, मधुकर चव्हाण, मधु चव्हाण असे कितीतरी आजी माजी आमदार नि मंत्री. “सोशल इंजिनियरींग”च्या प्रयोगामुळे आता राजकारणातील मराठा टक्काही उतरणीला लागलाय….
निवडक
लंडनचे महापौरपद भुषवुन सदाशिवराव देशमुख यांनी मराठ्यांचा झेंडा डौलाने अटकेपार फडकविलाय. राज्याच्या मुख्य सचिवपदाची धुरा अजित निंबाळकर यांनी तर गुजरातच्या मुख्य सचिवपदाची धुरा हिरजराव पाटणकर यांनी भुषविलीय. पोलिस महासंचालकपदाचा बहुमान शिवाजीराव बारावकर यांनी मिळविलाय. स्वामीकार रणजीत देसाई, पानिपतकार विश्वास पाटील, शंकर पाटील, बाबा कदम, डॉ.आ.ह.साळुंखे, सरोजिनी बाबर, डॉ.जयसिंगराव पवार आदींनी साहित्य क्षेत्रात आपली नाममुद्रा उमटवलीय. सिनेक्षेत्रात दिनकर पाटील, सयाजी शिंदे, शिवाजी साटम, स्मिता पाटील आदींनी चमक दाखवलीय.
गावाकडची शेती खुंटली !
मुलुखगिरी, स्वाऱ्या करण्याचे मराठ्यांचे दिवस केव्हाच इतिहासजमा झालेत. इनामे खालसा झालीत. सरंजामशाही, राजेशाही नष्ट झाली. शेती कुळ कायद्यात गेली. उरलेल्या शेतीची वाटणी होऊन तुकडे तुकडे झालेत. पाण्याअभावी ठिकठिकाणची शेती ओसाड पडलीय. परिणामी काही अल्पभुधारक तर काही भुमीहीन झालेत. अपुऱ्या शेतीवर पोट भरता येत नाही. त्यामुळे अनेकांचे उपजिविकेचे साधनच हरपलेय. गावात घरोघरी अठराविश्व दारिद्रय. काहींची घरे कुलुपबंद. काहींच्या घरात केवळ म्हातारीकोतारी मंडळी. निव्वळ पेन्शनवर वा मनीऑर्डरवर कसेबसे दिवस ढकलणारी….
शहरी दारिद्रय
काही मराठ्यांनी लष्करात सेवा पत्करली तर उर्वरितांनी पोटाची खळगी भरण्यासाठी शहराकडे धाव घेतली. शहराकडे धाव घेणारे “बैठकीच्या खोल्यां”मध्ये “बॅचलर” म्हणुन राहु लागले. माथाडी म्हणुन राब राब राबु लागले. कुणी गिरण्या गाठुन पडेल ते काम केले. शिक्षणाअभावी कुणी भाजीपाला विक्रेत्याची भुमिका वठवली. कुणावर शिपाई होण्याची तर कुणावर वॉचमन होण्याची पाळी ओढवलीय. ज्यांनी एकेकाळी झोपडपट्टया पाहुन नाके मुरडली, त्याच मराठ्यांवर आता झोपडपट्टयांमध्ये मोठ्या संख्येने राहण्याची पाळी ओढवलीय. अनेक जण तर त्याही पलिकडे म्हणजे विस्तारित मुंबईबाहेर फेकले गेलेत. ठेचकाळत, धडपडत शिकुन सवरुन मोठी झालेली थोडीबहुत मुलेच चांगल्या हुद्यावर गेलीत. कुणी मिळेल ती चाकरी करतेय. पण, बहुसंख्य मध्यमवर्गीय मराठ्यांची मुले नोकऱ्यांसाठी वणवण भटकताहेत. घरात दोन वेळचे पोटात ढकलल्यानंतर कुणी नैराश्याने नाक्यावर उभे राहतेय. कुणी पत्ते कुटतेय. कुणी कॅरम खेळतेय. कुणी भाई होतेय. ना वास्तवाचे भान ना भविष्याची चिंता.. असाच त्यांचा जीवनाचा अक्षरशः “टाइमपास” सुरुय….
आरक्षण हवेय !
मुठभर पुढारी सोडल्यास जवळपास नव्वद टक्के मराठा समाज शैक्षणिक, सामाजिक व आर्थिकदृष्टय़ा दारिद्रयाचे दशावतार भोगतोय. शिक्षणाअभावी नोकरीतील प्रमाण अडीच ते तीन टक्केच आहे. शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला. आर्थिकदृष्टया खचलेला. म्हणुनच राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापुर संस्थानच्या जाहीरनाम्यात २६ जुलै १९०२ रोजी प्रशासनातील नोकऱ्यात ५० टक्के आरक्षण दिले गेले व त्यात मराठा जात सामील होती. १९५६ मध्ये नेमलेल्या कालेलकर आयोगाने मराठा जातीचा समावेश इतर मागासलेल्या समाजामध्ये केलाय. आता कुणबी मराठा, मराठा कुणब्यांना ओबीसीच्या आरक्षणाची कवाडे उघडण्यात आलीत. त्यामुळे आता हिंदु-मराठ्यांचाही समावेश ओबीसींमध्ये करा किंवा मराठयांसाठी स्वतंत्र आरक्षण द्या, मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात आणि नोकऱ्यांत आरक्षण द्या अशी मागणी जोर धरतेय. दिल्लीचे तख्त राखणारा, देशगौरवासाठी झिजणारा नि निढळाच्या घामाने भिजणारा मराठा आता अक्षरशः दारिद्रय़ाच्या उन्हात शिजतोय…. हा विस्कटलेला नि फुटीने ग्रासलेला समाज एकत्र येईल तेव्हाच प्रगतीचे शिखर गाठेल, हे नक्की !