अरे राजे म्हणून जन्माला आलो नाही म्हणून काय झाले. आज राजे म्हणून मरण्याचे भाग्य माझ्या नशिबी आले. माझ्या १० पिढ्यांची पुण्याईच माझ्या वाट्याला आली असे म्हणत शिवा काशीद यांनी प्राण सोडले. राजे निसटल्या मुळे सिद्दी जौहर वैतागला होता सिद्दी हिलाल ला त्याने राजेंच्या पाठीवर धाडले. राजेंची पालखी जिवाच्या बाजीने पळत होती हिरडस मावळातील बांदल देशमुख आणि वेळवंड खोऱ्यातील धुमाळ देशमुख आणि बाजी बांदल देखील पळत होते. आता सिद्दीची फौज येताना दिसू लागली काय करावे सुचेना. स्वराज्याच्या जीवाचा प्रश्न.

बाजी बांदल मोठ्या हिमतीचा माणूस आता जीवनावर बेलपत्र ठेवून शर्थीने लढायचे हे त्यांनी जोखले. बाजींचे डोळे निर्धाराने चमकू लागले. दाट झाडीत दडलेली मठ गजापुरची खिंड सहा फर्लांग लांबीची रौद्ररूप धारण केलेली घोडखिंड बाजींच्या संगती उभी होती. बाजी निर्धारपूर्वक म्हणाले
“महाराज, तुम्ही निमे लोक घेऊन गडावर निघून जाणे. तो पावेतो या खिंडीमध्ये आपण निमे मावळे घेऊन दोन दोन प्रहर पावेतो पाठीवर फौज येऊन देत नाही. साहेबी निघोन जाणे. आपण साहेब कामावरी मरतो. साहेब कामावरी पडलो तरी मुलांलेकरास अन्न देणार महाराज आहेत.”

राजे लवकर तयार झाले नसतीलच पण ऐकतील ते मावळे कसले आई भवानीच्या स्वराज्याच्या आणाभाका घालून राजांस पुढे पाठविले

आता राजे उरलेले मावळे सोबत घेऊन विशाळगडाकड़े निघाले. बाजींनी खिंडीमध्ये आपली व्युहरचना केली. चढणीवरच्या आणि आसपासच्या झाडीमध्ये गटागटाने मावळे तैनात केले. प्रत्येकाकडे गोफणीतून भिरकवायचे दगड आणि ढकलायचे शिलाखंड जमा केले गेले. शत्रु टप्यात येण्याची वाट बघत सगळे दडून बसले होते. १२-१३ तासांच्या अथक वाटचाली नंतर सुद्धा निवांतपणा नव्हता.

निर्णायक लढाईसाठी आता ते ३०० वीर सज्ज झाले होते. पूर्वेच्या दिशेने घोड्यांच्या टापांचे आवाज ऐकू येऊ लागले. थोड्यावेळात शत्रु नजरेत येऊ लागला पण शत्रुच्या नजरेत लपलेले मावळे काही येत नव्हते. त्या अवघड निसरड्या वाटेने एक रांग धरून सिद्दीमसूदचे घोडेस्वार उतरु लागले. गोफणीच्या टप्यात शत्रू आल्यावर बाजींनी एकच हाकाटी दिली आणि अचानक शत्रूच्या अंगावर दगड बरसू लागले. घोड्यांनी कच खाल्ली. काही उधळले. काही सरकून पडले. एकच गोंधळ उडाला.

कित्येकांची डोकी फुटली, बाकी जिवाच्या भीतीने मागे पळाले. मावळ्यांनी हर हर महादेवचा नारा दिला. पण शत्रू इतक्यात मागे सरकणार नव्हता. घोडेस्वार पुन्हा उतरु लागले. मावळ्यांनी पुन्हा दगड भिरकवायला सुरवात केली. ते शत्रूला काही केल्या पुढे सरकू देईनात. साधारण ४ वाजत आले होते. थोड़े मागून येणाऱ्या आदिलशहाच्या पिडनायकाचे पायदळ आता खिंडीकड़े येउन पोचले. ते अधिक वेगाने ओढ़यापलिकडे सरकू लागले. आता मावळ्यांनी त्यांच्यावर शिलाखंड ढकलायला सुरवात केली. त्यामुळे पायदळाची पांगापांग होऊ लागली. अखेर तासाभरानी शत्रूला वर पोहोचण्यात यश मिळाले.

आता आजूबाजुच्या झाडीमधून बाजी बांदल आणि इतर मावळे बाहेर पडले आणि प्रत्यक्ष रणमैदानात शस्त्राची लढाई सुरु झाली. एक-एक मावळा त्वेषाने लढत होता. दहा-दहा जणांना पुरून उरत होता. बाजींच्या तलवारीच्या टप्यात येणारा प्रत्येकजण यमसदनी जात होता.

स्वतःच्या छातीचा परकोट करून हा बाजी दोन्ही हातात तरवार घेऊन लढत होता. समोर येणाऱ्या प्रत्येकावर त्यांची जमदाड बरसत रणचंडी बाजींवर प्रसन्न झाली होती. इतरांचा आवेश देखील डोळ्यांचे पारणे फेडण्याजोगे होता. बाजीं बांदल, रायाजी बांदल आणि इतर बांदल मावळे लढत अनेक जण पडत होते. पडता पडता देखील दोघे तिघे घेऊनच ते जमिनीवर कोसळत होते. बाजींच्या अंगावर देखील अनेक जखमा झाल्या होत्या पण हा रणगाझी कुणाला वश होत नव्हता.

त्यांचा आवेश पाहून शत्रूचे धाबे दणाणले होते. बाजी आता अधिक त्वेषाने लढत होते. त्यांच्या देहाची आता चाळण उडाली होती. रक्ताचे अर्ह्य ओसंडत होते. हे काही आपली वाट सोडत नाहीत असे पाहून पिडनायकाने आपल्या एका पायदळ सैनिकाला ठासणीच्या बंदूकीतून बाजींवर गोळी झाडायला सांगितली. ती गोळी बाजींच्या खांद्यात घुसली. बाजींचा शस्त्राचा एक हात थांबला. लढता-लढता ते खाली कोसळले.

“बाजी बांदल” व “रायाजी बांदल” यांच्या सोबतीला “गुंजन मावळ, हिरडस मावळ आणि रोहीड खोरे” मधील इतरही काही मावळे होते. त्यात प्रामुख्याने शिंदे, गव्हाणे, चव्हाण, विचारे, खाटपे, सडे, धुमाळ, जाधव, शेलार, जगदाळे, भेलके, इंगळे आणि इतर काही मावळ्यांचा समावेश होता. “बाजी प्रभू देशपांडे” जे “बांदल” यांच्याकडे “चिटणीस / कारकून” म्हणून काम करत होते. यांनी लढविली खिंड….

©आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची

There are no comments yet.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked (*).

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>