बाजीप्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशपांडे होते. बाजी प्रभू हे हिरडस मावळचे वतनदार असणाऱ्या बांदलांचे दिवाण होते. परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समर्पिली. बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी, स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असे होते.

इ. स. २ मार्च १६६० मध्ये कर्नुलचा सरदार सिद्धी जौहर याने पन्हाळगडाला वेढा दिला. सुमारे ४ महिने उलटून हि सिद्धी वेढा ढिला करत नव्हता. भर पावसात हि सिध्दीने वेढा भक्कम ठेवला होता. सर्व उपाय करून झाले तरी यश येत नाही हे पाहून महाराजांनी वेढा फोडायचा एक धाडसी निर्णय घेतला. १२ जुलै १६६० च्या रात्री पन्हाळ्याला घातलेल्या सिद्धीच्या वेढ्यातून सुटून महाराज विशाळगडाकडे निघाले होते.बाजीप्रभू हे बांदल यांचे सरदार होते. त्यांच्यासोबत रायाजी बांदल,फुलाजी प्रभू आणि सुमारे ६०० बांदल मावळे होते. सिद्दीला तुरी देण्यासाठी आखलेला प्रतिशिवाजीचा डाव उघडकीस आला आणिआपली फसवणूक झाली हे लक्षात येऊन मसूद विजापुरी सैन्य घेऊन महाराजांचा पाठलाग सुरु केला. पुढचा धोका लक्षात घेऊनच वडीलकीच्या अधिकाराने बाजींनी महाराजांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत (घोडखिंडीत) सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभे राहिले. हजारोंच्या सैन्याला ३०० मराठी मावळ्यांनी रोखले होते. सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास खिंड लढविली आणि पराक्रमाची शर्थ केली.

सिद्धी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी, जखमी झालेले स्वतःचे शरीर या कशाचेही भान बाजींना नव्हते. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार, विटा घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता. बाजी आपल्याला काबीज होत नाही, हे पाहताच मसूद ने बंदूक मागवली. बंदुकीने बाजींवर वार केला. बाजी कोसळले, शरीरावरील जखमा आणि अथक प्रवास ह्यामुळे बाजींना ग्लानी आली. मावळ्यांनी ग्लानी येऊन पडलेल्या बाजींना मागे नेले, दुसरी फळी पुढे आली आणि खिंड लढत होती. बाजींना थोड्यावेळातच शुद्ध आली आणि त्यांनी तोफ झाल्याची विचारणा केली, नकारार्थी उत्तर येताच सर्व दम एकवटून जखमी बाजी परत खिंडीच्या तोंडाशी गणिमाना थोपवण्यासाठी गेले. त्याचवेळी विषलगडावरून झालेल्या तोफांचे आवाज ऐकल्यावर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले. (ही घटना दिनांक १३ जुलै, १६६० रोजी घडल्याची इतिहासात नोंद आहे.)

मराठी मावळ्यांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड पावन झाली म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले. बाजी – फुलाजी बंधूंवर विशाळगडावर, महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बाजीप्रभू व फुलाजी यांची समाधी विशाळगडावर आहे. तसेच पन्हाळगडावर बाजीप्रभूंचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे.

There are no comments yet.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked (*).

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>