मराठा आमदारांची नागपूरात गोलमेज परिषद

नागपूर – विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नागपूर येथे दुसरी गोलमेज परिषद झाली. या परिषदेत मराठा समाजातील सर्व पक्षीय आमदारांनी आरक्षणासह इतर मागण्यांवर सविस्तर चर्चा केली. या अधिवेशनात सर्व मागण्या प्रभावीपणे मांडण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. तसेच सर्वपक्षीय मराठा आमदारांनी मुख्यमंत्र्यानां भेटून आठवडाभरात राज्य मागासवर्ग आयोगवरील नियुक्त्या करण्याचा निर्णय या परिषदेत घेण्यात आला.

परिषदेत आरक्षणाचे अभ्यासक प्राचार्य एम् एम् तांबे, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, आरक्षण अभ्यासक राजेंद्र कोंढरे, व्यंकटेश पाटील, भैया पाटील यांनी मराठा समाजाच्या मागण्यांची सविस्तर मांडणी केली. प्राचार्य तांबे यांनी आरक्षणाच्या मुद्दयांवर देशभरातील विविध खटल्यांचे दाखले दिले. तसेच सरकारने कोर्टात मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करणारे पुरावे प्रभावीपणे मांडण्याची गरज विशद केली. त्याचबरोबर राज्य मागासवर्ग आयोगावरील नेमणूका तात्काळ करण्याची मागणीही यावेळी केली. तर व्यंकटेश पाटील यांनी राणे समितीच्या शिफारशी मराठा आरक्षणाला पोषक असल्याचे सांगितले. तसेच या अहवालातील निष्कर्षनुसार मराठा समाज आरक्षणाला पात्र असल्याचे त्यांनी सांगितले.

पूर्वी मराठा समाज सर्वात लँडहोल्डर होता. तसेच राजकारण, सहकार या क्षेत्रांत मराठा समाजाने आपले स्थान निर्माण केले होते . मात्र, हा भूतकाळ झाला. सध्या मराठा समाजासमोर अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. शिक्षण, नोकरी, व्यवसाय आदींसह विविध क्षेत्रांत हा समाज आता मागे पडला आहे. वर्तमानकाळात मराठा समाज जॉबलेस, लँडलेस आणि पॉवरलेस बनल्याचे राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले. मराठा समाजाती दशा, दिशा आणि आरक्षण या अनुषंगाने पहिली गोलमेज परिषद कोल्हापुरात झाली होती. आता त्यापुढचे पाऊल म्हणजे मराठा आमदारांसाठी दुसरी गोलमेज परिषद आयोजित केल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. परिषदेचे आयोजन भैया पाटील यांनी केले.